Ad will apear here
Next
स्वर-शब्द-प्रभू


कित्येक घडून गेलेल्या प्रसंगांबद्दल, घटनांबद्दल आपल्या मनांत काही चित्रं नोंदवली जात असतात. त्यातील काही तर एखाद्या चित्रफितीप्रमाणे आपण नंतरही आठवू शकतो. तो प्रसंग जणू आपण परत एकदा जगून बघत असतो. माझ्याही मनाच्या कप्प्यात अशी काही दृश्ये विराजमान आहेत. प्रसंगी ती एखादे पुस्तकाचे पान दिसावे तशी स्पष्ट दिसू लागतात. त्यातीलच ही काही दृश्ये.

दृश्य एक : मी कॉम्प्युटरवर एक चित्रफीत बघतोय. एका मराठी गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू आहे. हे ध्वनिमुद्रण नंतर परत एकदा झाले असावे. कारण मूळ गाणं हे १९६१ च्या ‘सुवासिनी’ या चित्रपटातील आहे. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचा प्रोफाइल दिसतो. व्हायब्रोफोन वाजतो. शब्द ऐकू येऊ लागतात – ‘दिवसामागुनि दिवस चालले, ऋतुमागुनी ऋतू, जिवलगा कधी रे येशील तू...’ कॅमेरा वळून काचेच्या पलीकडे मायक्रोफोनसमोर उभ्या असलेल्या, केसात मोठे फूल माळलेल्या, आकाशी रंगाची साडी नेसलेल्या आशाताईंवर स्थिरावतो. ध्रुवपदाची ओळ संपते न संपते तोच हाय पीच असलेली बासरी ऐकू येऊ लागते आणि कॅमेरा आपल्याला बासरीवादकाचं दर्शन घडवतो. ते असतात आमचे अजित सोमण सर.

दृश्य दोन : मुंबईचं वीर सावरकर भवन. पंडित बिरजू महाराज यांच्या नृत्याचा कार्यक्रम. तबल्यावर साथ करत आहेत उस्ताद झाकीर हुसेन. त्याच ओळीत बसले आहेत सतारवादक अतुल केसकर आणि बरोबरच आहेत बासरीवर साथ करणारे अजित सोमण सर.

दृश्य तीन : दापोलीजवळचे आंजर्ले गाव. जाहिरात क्षेत्रात काम करणारे आम्ही काही जण सहलीसाठी तेथे गेलेलो. तेथील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे ‘कड्यावरचा गणपती’. त्या मंदिराचा शांत गंभीर गाभारा. वेळ संध्याकाळची. सगळा परिसर शांत. आणि हवेत फक्त बासरीतून पाझरणाऱ्या श्री रागाचे मंजुळ स्वर. वादक अर्थातच अजित सोमण सर.

दृश्य चार : पुण्याची सदाशिव पेठ. ‘ब्लूम ॲडव्हर्टायझिंग’ या संस्थेचं ऑफिस. दारातून आत गेल्यावर उजवीकडच्या पहिल्याच टेबलवर अत्यंत तल्लीनपणे लेखन करणारी, अर्थातच जाहिरातीची ‘कॉपी’ लिहिणारी एक व्यक्ती आपल्याला दिसते. ते असतात आमचे अजित सोमण सर.

माझ्या मनात त्यांच्या अशा अनेक प्रतिमा आहेत. एक बासरीवादक, प्राध्यापक, कॉपी रायटर, संहिता लेखक, संगीत दिग्दर्शक, कलाशिक्षक अशा विविध रूपांचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे प्रा. अजित सोमण. कुठल्याही विषयात शंका विचारा, पुढच्या क्षणाला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार! परत कुठे त्यात अहंभावाचा मागमूसही नाही. कमालीचा साधेपणा.

तेव्हा माझं ऑफिस पुण्याच्या शनिवार पेठेत होतं. मी ऑफिसमध्ये नुकत्याच काढलेल्या फोटोंवर प्रोसेसिंग करीत होतो. एक मोठा प्रिंट काढून मी टेबलवर ठेवला होता. एका प्रसन्न हसणाऱ्या निरागस लहान मुलीचा फोटो होता तो. इतक्यात सोमण सर आले. त्यांनी तो प्रिंट पाहिला. त्या काळात श्याम देशपांडे, सर व मी मिळून साप्ताहिक सकाळ या साप्ताहिकासाठी बरेच काम करत होतो. साप्ताहिकाचा अंक त्या वेळी ‘टॅब्लॉइड’ या मोठ्या आकारात प्रसिद्ध होत असे. तो आता मासिकाच्या आकारात प्रसिद्ध होणार होता. त्याच्या काही जाहिराती करायच्या होत्या. मोठ्या आकारातून लहान आकारात त्याचं रूपांतर होणार होतं. हा विचार सरांच्या मनात होताच. तो लहान मुलीचा प्रिंट पाहून सर खूष झाले व म्हणाले, ‘अरे, झालं की आपल्या पहिल्या जाहिरातीचं काम.’ माझ्या लक्षात आलं, की सरांच्या डोक्यात काही तरी कल्पना तयार झालीय. मला म्हणाले, ‘कागद दे एक.’ खिशातून पेन काढत मी दिलेल्या कागदावर सरांनी ओळी लिहिल्या. ‘साप्ताहिक सकाळ - छान... देखणा... हवाहवासा. चटकन उचलून घ्यावासा वाटणारा... अन् आता चटकन उचलून घेताही येईल अशा आकारात.’ एका प्रकाशचित्राचे अनोख्या जाहिरातीत रूपांतर झालेले मी अनुभवत होतो तसेच एका जाहिरातीच्या कॅम्पेनची सुरुवातही.

पाच मे १९९३ रोजी माझ्या मुलाचा म्हणजे धृवचा जन्म झाला. ती आनंदवार्ता मित्र व आप्तेष्टांना कळविण्यासाठी मला एक ‘मेलर’ तयार करायचे होते. मी सरांचं माडीवाले कॉलनीतील ‘सोमण परमधाम’ गाठलं. सरांना व सौ. अनुराधावहिनींना ही बातमी सांगताच त्यांनी माझं अभिनंदन केलं. त्यांचा गोडाचा आग्रहाचा पाहुणचार तर मला नित्य अनुभवाचा होताच. मी मेलरविषयी कल्पना सांगितल्यावर सरांनी त्यांचे शेजारीच असलेले लिहिण्याचे पॅड घेतले. त्यांनी लिहायला सुरुवात केली. पाचच मिनिटांत त्यांचे लिखाण पूर्ण झाले. काय लिहिले आहे याची मला खूपच उत्सुकता होती. सरांनी ती गोड बातमी प्रत्यक्ष नवजात अर्भकच सांगत आहे अशी शब्दांची रचना केली होती. सरांनी लिहिले होते, ‘मे महिन्याची पाच तारीख म्हणजे आजपर्यंत फक्त आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख होती. आता ती माझ्यापण वाढदिवसाची तारीख असणार आहे. मी कोण? अहो, मी सर्वांत छोटा पाकणीकर! बाबांच्या फोटोग्राफीला अगदी ताजा विषय. सगळीच मंडळी माझ्यात गुंतून गेली आहेत. तेव्हा म्हटलं – आपणच सांगावं – पाच मे ९३पासून पाकणीकर कुटुंबात आता माझी भर पडली आहे. येणार नं मला भेटायला?’

लहान बाळाच्या वेगवेगळ्या मुद्रा असलेली रेखाटने आणि सरांचा अभिनव असा मजकूर यांनी सजलेलं ते मेलर डिझाइन सर्वांनाच खूप आवडलं हे सांगायची गरजच नाही.

त्यांचं शब्द प्रेम, स्वर प्रेम व या दोन्हीतून निर्माण होणाऱ्या संगीताबद्दलचं प्रेम हे मी अनुभवलं, जेव्हा त्यांनी माझ्या थीम कॅलेंडर्ससाठी मोजक्याच शब्दात परिणामकारक व अचूक असं लिखाण केलं तेव्हा. त्यांचा मिश्किलपणाही मला त्या वेळी अनुभवायला मिळाला. पहिल्याच थीम कॅलेंडरच्या वेळची आठवण आहे. भारतीय अभिजात संगीतातील ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंतांची कृष्ण-धवल प्रकाशचित्रे त्यात समाविष्ट होती. प्रत्येक पानावर त्या-त्या कलावंतांची एका ओळीतील संगीतविषयक भाष्ये दिलेली होती. मी कॅलेंडरची डमी सरांना दाखविली. त्यात एक वाक्य असं होतं, की – ‘If you have to learn music, you have to surrender yourself to music.’ त्या वेळी सर्वच कलाकारांनी भरपूर बिदागी घेण्यास सुरुवात केली होती. तो धागा पकडत सर मला म्हणाले, ‘बाकी सर्व उत्तम आहे. फक्त या वाक्यात दुसऱ्यांदा आलेल्या Musicचं स्पेलिंग चुकलंय.’ मी वाक्य दोनदा वाचलं तरी मला चूक दिसेना. माझा हा गोंधळ पाहत सर हसत हसत म्हणाले, की – ‘ अरे दुसऱ्या Musicचं स्पेलिंग Money असं हवं ना ?’

२००५च्या ‘दिग्गज’ कॅलेंडरपासून ते २००९च्या ‘बज्म-ए-गझल’ या कॅलेंडरपर्यंत सरांच्या विद्वत्तापूर्ण अशा लिखाणाचा समावेश मला कॅलेंडरमध्ये करता आला. ‘दिग्गज’मध्ये प्रत्येक पानावर त्यांनी त्या-त्या व्यक्तीविषयी दोन-दोनच ओळी लिहिल्या होत्या; पण त्या दिग्गजांचं पूर्ण व्यक्तित्वच त्यांनी उभं केलं होतं. दोन उदाहरणं द्यायचा मोह मला होतोय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ते लिहितात, ‘श्वासाच्या लयीत अखंड चालणारा एक नितळ प्रवाही सूर! मांगल्य आणि प्रसन्नता यांचा नादमय आविष्कार.’ स्वररंगी रंगलेल्या आशा भोसले यांच्याविषयी ते म्हणतात – ‘स्वरा तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा! खळाळत्या निर्मल व्यक्तिमत्त्वासारखाच उत्फुल्ल गायनशैलीचा वाहता झरा.’ २००८च्या ‘स्वराधिराज भीमसेन’ या कॅलेंडरमध्ये त्यांनी भीमसेनजींच्या बारा विविध पैलूंचे यथार्थ वर्णन केले होते. भीमसेनजींच्याही पसंतीस ते उतरले होते. या सर्व प्रवासात शास्त्रीय संगीताचा वापर सुगम संगीतात व चित्रपट संगीतात कसा झाला आहे हे सांगण्याची त्यांची हातोटी अनुभवताना मी समृद्ध होत गेलो.

हे सर्व असामान्य गुण असूनही सर एकदम निर्मोही होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यावर त्यातून ते सहजासहजी बाहेर पडत. त्यांचा एक किस्सा, ज्यात सरांचा हा स्वभाव प्रकर्षाने दिसून येतो तो आमचा मित्र सुधीर गाडगीळने सांगितला होता. ते सगळे कर्वे रोडवरील अनिल पानवाल्याकडे जमत. एकदा असेच बसलेले असताना एक नट, जो स्वतःला निवेदक, लेखकही समजे, तो आला. त्याने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीतील त्याच्या कॉपीस बक्षीस मिळाल्याचे सांगितले. वास्तविक ती कॉपी सोमण सरांची; पण तो नट बढाई मारत होता त्यावर. त्याचा थापा मारण्याचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता. सर गालातल्या गालात हसत होते. तो नट निघून गेल्यावर सुधीरने सरांना विचारले, ‘अरे सोमण्या, ती जाहिरातीची कॉपी तुझी आहे आणि तो थापा मारतोय हे माहीत होतं ना तुला? तू ऐकून कसं घेतलंस? त्याला बोलला का नाहीस?’ यावर सर म्हणाले, ‘त्याला मजा वाटतीय ना ? आनंद मिळतोय ना? जाऊ दे ना मस्त! आपल्याला काय त्याचं?’ असे हे सोमण सर.

तो दिवस होता ३० डिसेंबर २००५. मी कमिन्स कंपनीची एक असाइनमेंट संपवून दमण येथून परत येत होतो. माझ्या फोनची रिंग वाजली. पलीकडून सरांचा मुलगा गुणवर्धन बोलत होता. त्याने सांगितले, ‘काका, बाबांना एक पुरस्कार मिळाल्याचे पत्र आज आले आहे. पुरस्कार सोहळा दहा जानेवारीला आहे; पण त्याआधी त्याबद्दल वर्तमानपत्रांना कळविण्यासाठी मी प्रेस नोट करीत आहे. त्याबरोबर बाबांचे फोटो द्यायचे आहेत. तर त्यांचे काही फोटो काढावे लागतील; पण मी हे बाबांना सांगितले तर ते तयार होणार नाहीत. काय करायचे?’ मी त्याला म्हणालो, ‘मी प्रवासात आहे. साडेनऊ-दहापर्यंत मी पुण्यात पोहोचेन. तू त्यांना कुठे जायचे आहे हे सांगू नकोस. माझ्या ऑफिसवर त्यांना घेऊन ये. मग काढू फोटो.’ त्याप्रमाणे गुणवर्धन त्यांना व त्यांचा बासरीचा बॉक्स घेऊन कोथरूडला पोहोचला. सरांना कल्पना आलीच होती. ते आले. नेहमीचे चेष्टा-मस्करीचे वातावरण तयार व्हायला काहीच वेळ लागला नाही. मी फोटोंच्या तयारीला लागलो. माझी प्रकाशयोजना होईपर्यंत अजून अर्धा तास गेला; पण तेवढ्यात सरांनी वेणूवादन सुरूही केले होते. सगळा स्टुडिओ राग बागेश्रीच्या सुरांनी भरून गेला होता. बरोबर पावणेअकरा वाजता मी सरांचा पहिला फोटो क्लिक केला होता. आणि पुढे बराच वेळ मी प्रकाशचित्रण आणि श्रवण या दोन्हींचा आनंद घेत होतो. मधूनच प्रकाशयोजनेत काही बदल करत होतो; पण सरांचे वादन मात्र अखंडित सुरू होते. एकदा त्या मॉडेलच्या भूमिकेत गेल्यावर त्यांनी ती भूमिकाही मन लावून केली. आणि त्यांचा तो विशेष असा फोटोसेशन संपन्न झाला. त्या तासाभरात मी त्यांच्या मैफलीचा मूड असलेल्या विविध अशा साठ भावमुद्रा कॅमेराबद्ध केल्या.

त्यांना मिळालेला पुरस्कारही त्यांनी अत्यंत निर्लेपपणे स्वीकारला. तो सत्कार होता एका बहुस्पर्शी कलावंताचा. तो सत्कार होता संगीत, नृत्य व लेखन या अभिजात कलांवर प्रेम करणाऱ्या एका श्रेष्ठ साधकाचा. तो सत्कार होता ‘अत्तरविक्याशी संगत करावी, त्याने काही दिलं नाही तरी सुवास आपल्याला नक्की येतो’ ही कबीराची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या एका कलावंताचा. तो सत्कार होता एका स्वर-शब्द-प्रभूचा!

एरव्ही मस्त शांतपणे, अत्यंत निवांतपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्या सोमण सरांनी इतक्या लवकर, अचानक निघून जाण्याची घाई का केली हे ती नियतीच जाणो! शायर निदा फाज़ली हे कधी सोमण सरांना भेटले होते का हे मला माहीत नाही. भेटले असतील. कारण त्यांच्या एका गज़लमध्ये एक ओळ आहे - ‘एक महफ़िल में कई महफ़िलें होती है शरीक’. त्यांना सोमण सरांच्या मैफलींचा अनुभव आला असावा का? नाही! पण ते नसतीलच भेटले, कारण, त्याच गज़लची पहिली ओळ आहे – ‘उस के दुश्मन हैं बहुत आदमी अच्छा होगा’. इथे फाज़लींना लिहावं लागलं असतं, की – ‘उस के दोस्त हैं बहुत आदमी यकिनन अच्छा ही होगा’!’

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CXRACP
Similar Posts
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी
गृहिणी-सखी-सचिव (पूर्वार्ध) सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास.
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language